व्यासंगी पत्रकार गोविंद तळवलकर आणि दि. वि. गोखले यांच्या कसोटीला तरलेले समीक्षक म्हणून ज. द. जोगळेकर यांचा उल्लेख करावा लागेल. जोगळेकर यांचे वाचन तर अफाट आहेच , पण त्याबरोबर त्यांची वैचारिक बैठकही पक्की आहे. वारकरांच्या विचारांवर श्रध्दा असलेले जोगळेकर तर्कशुध्द दृष्टीने जगाकडे पाहतात. एक चिंतनशील विचारवंत म्हणून वयाची नव्वदी उलटल्यानंतरही त्यांची विचारयात्रा चालूच होती.
जगाच्या इतिहासावर परिणाम करणा-या घटना आणि व्यक्तिंविषयीची पुस्तके वाचणे हे त्यांचे जणु जीवनव्रत होते. अशाच काही गाजलेल्या इंग्रजी पुस्तकांचं त्यांनी कलेलं परीक्षण महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रसिध्द होत असे. या वाचकप्रिय सदरातील ६३ लेखांचा हा संग्रह. खरं तर ही केवळ परीक्षणं नाहीत, तर विविध घडामोडींवरचं पुस्तकाच्या अनुरोधाने केलेलं हे भाष्य आहे. राज्यक्रांत्या, महायुध्दे, जागतिक राजकारण, रणनीती आणि या सगळ्यांचं नियंत्रण करणा-या जागतिक नेत्यांचं व्यक्तिमत्व आशा अनेक विषयांचा एक मोठा पट उलगडण्याची ताकद या समीक्षणांमध्ये आहे. मॅकमिलन यांचं चरित्र ‘ पॉईंटींग द वे ‘ , हॅरिसन यांचं ‘ लॉंग मार्च टु पॉवर, सिडनी अस्टर यांचं ‘ द मेकिंग ऑफ द सेकंड वर्ल्ड वॉर ‘ , अरनॉल्ड टॉयन्बी यांचं ‘ मॅनकाईंड ऍंड मदर अर्थ ‘, रोनाल्ड लेव्हिन यांचं ‘ द चीफ ‘ या पुस्तकांची परीक्षणं याची साक्ष देतील.