भारतीय संसदेनं २०१६ साली नवीन अपंग अधिकार व कल्याण कायदा पारीत केला. १९९५ सालच्या कायद्यात अपंगत्वाच्या केवळ सात प्रकारांचा समावेश होता. त्यात आणखी चौदा प्रकारांची भर घालून नवीन कायद्यानं अपंगत्वाच्या एकूण २१ प्रकारांना आपल्या कक्षेत घेतलं आहे.
आता या कायद्यामध्ये अंधत्व, तीव्र दृष्टी दोष, कुष्ठरोगातून आलेलं अपंगत्व, कर्णबधिरता आणि कमी ऐकू येणं, शारीरिक अपंगत्व, अतिठेंगूपणा, बौद्धिक अपंगत्व, मानसिक आजार, स्वमग्नता, प्रमस्तिष्क पक्षाघात (सेरेब्रल पाल्सी), मांसपेशी दुर्विकास ( मस्क्युलर डिस्ट्रॉफी), मज्जातंतूशी संबंधित दीर्घकालीन विकार, अध्ययन अक्षमता, वाचा आणि भाषा दिव्यांगत्व, मल्टिपल स्केरॉसिस, थॅलेसेमिया, सिकल सेल आजार, हिमोफिलिया, पार्किन्सन, बहुविकलांगता, आणि ऍसिड हल्ल्याचे बळी या सर्व प्रकारांचा समावेश आहे.
या सर्व प्रकारांची लक्षणं, या गटातल्या लोकांना जाणवणाऱ्या अडचणी याविषयी मांडणी करतानाच मानसिक दृष्ट्या खचून न जाता त्यावर मात करण्याचे उपाय सुचवून या गटातल्या लोकांना आणि त्यांच्या पालकांना पुढं जाण्याचं बळ पुस्तकातून मिळत जात.