भारतात आपल्या मुलांची आयुष्यातली यशस्विता आणि औपचारिक शिक्षण याची सांगड घट्ट आहे. त्यामुळंच अभ्यासात मागं पडणारी मुलं हा शिक्षक आणि पालक सर्वांसाठी चिंतेचा विषय असतो. निरनिराळ्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक तसंच शारीरिक किंवा बौद्धिक अक्षमता अशा निरनिराळ्या कारणांनी मुलं अभ्यासात मागं पडतात.
पण काही मुलं मात्र शारीरिक, मानसिक दृष्ट्या सक्षम असतात. त्यांची बुद्धीमत्ता सर्वसाधारण, चांगली किंवा अत्युत्तम असते आणि तरीही मेंदूच्या रचनेत किंचितसा बदल असल्यानं त्यांना वाचन, लेखन,किंवा गणित अशी शैक्षणिक कौशल्यं शिकायला अडचणी येतात. त्यावेळी मात्र सर्वजण बुचकळ्यात पडतात. या स्थितीला अध्ययन अक्षमता म्हणतात याविषयी भारतात जाणीवजागृती वाढण्याची गरज आहे.
अध्ययन अक्षमतेच्या डिस्लेक्सिया (भाषाविषयक अडचण), डिसग्राफिया (लेखन कौशल्यात अडचण), आणि डिसकॅल्क्युलिया (गणित विषयक अडचण) या तिन्ही प्रकारांची लक्षणं, त्यावरचे उपाय आणि या अडचणींवर मात करण्यासाठी या गटातल्या मुलांना शिकवण्याच्या विविध पद्धती याविषयी सविस्तर मांडणी असलेल्या या पुस्तकातून या मुलांच्या बहुविध क्षमतांचं संगोपन होण्यासाठीची गरज अधोरेखित केलेली आहे. या मुलांना मदतरूप ठरून त्यांच्या प्रगतीसाठी पालक, शिक्षक अशा सर्वांनी नेमके काय प्रयत्न केले पाहिजेत याची सविस्तर माहिती पुस्तकातून समोर येते.