कोणतीही व्यक्ती भोवतालच्या जगाशी जोडली जाण्यासाठी ऐकणं आणि पहाणं या दोन मूलभूत संवेदना आहेत. यामध्ये जर काही कमतरता/ अक्षमता असेल तर या जोडलं जाण्यात अडचणी येणं स्वाभाविक आहे. आपल्या मुलामध्ये अशा कोणत्याही प्रकारची अक्षमता असेल तर बहुतेक वेळेला हा धक्का पचवणं पालकांना जड जातं. पण हा धक्का जितका लवकर पचवून परिस्थिती स्वीकारली जाते तितक्या लवकर त्यावरच्या उपाययोजना सुरु होतात. आणि परिणामतः मुलांना लवकर मदत मिळते. त्यातून अक्षमतेच्या स्थितीवर अधिक मोठ्या प्रमाणावर मात करणं शक्य होतं.
कर्णबधिरत्व असणाऱ्या काही मुलांच्या पालकांनी परिस्थिती कशी स्वीकारली, मुलांच्या लहान वयापासून त्यांनी नेमके कसे आणि कोणते शास्त्रशुद्ध प्रयत्न केले, मुलांनी नेमके कसे कष्ट घेतले आणि त्यातून या अक्षमतेवर मात करून ही मंडळी कशी आयुष्यात कशी यशस्वी झाली याची सविस्तर माहिती या पुस्तकातून मिळते.
कर्णबधीर व्यक्तींच्या यशोगाथा मांडणाऱ्या या पुस्तकातून या गटातल्याच नव्हे तर अनेक गटातल्या लोकांना उभारी मिळू शकते.