रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात स्वयंसेवी वृत्तीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या क्षमता संवर्धनासाठी १९८२ पासून कार्यरत आहे. प्रशिक्षण प्रबोधन आणि संशोधन या त्रिसूत्रीच्या आधारे गेली काही वर्षे म्हाळगी प्रबोधिनीची वाटचाल चालू आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात प्रशिक्षणाच्या विचारप्रेरणेतूनच प्रबोधिनीची मुहूर्तमेढ रोवली गेली.
सहकारापासून लोकप्रतिनिधीत्वापर्यंत आणि महिला कल्याणापासून पर्यावरणापर्यंत, विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण हा प्रबोधिनीच्या कार्याचा मुख्य भाग आहे.याशिवाय वेळोवेळी ऐरणीवर येणाऱ्या राष्ट्रीय व सामाजिक विषयांच्या अनुषंगाने चर्चासत्रे, परिसंवाद, व्याखाने, अभ्यास मंडळे, पुस्तिका प्रकाशन इ. प्रबोधनात्मक उपक्रमही प्रबोधिनीच्या वतीने होत असतात. कार्यकर्त्यांचे अनुभवविश्र्व समृद्ध व्हावे आणि त्यांची अभ्यासू वृत्ती वाढीला लागून एखाद्या विशिष्ट विषयाबाबत सर्वंकष माहिती संकलित व्हावी यासाठी संबंधित कार्यकर्ते व तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असलेल्या अभ्यासपथकाच्या अहवालावर आधारित पुस्तिकांचे प्रकाशनही केले जाते. शिवाय कार्यकर्त्यांना उपयुक्त ठरेल,असा संदर्भ सेवा विभाग हाही प्रबोधिनीच्या कार्याचा एक उल्लेखनीय पैलू आहे.
प्रबोधिनीच्या प्रकाशन विभागाची सुरुवात १९८९ साली झाली. ‘पं. दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्म मानववाद’ हे प्रबोधिनीचे पहिले प्रकाशन. “कार्यकर्ता” मनोभूमिकेतून काम करणाऱ्या व्यक्तीच्या वैचारिक भूमिका स्पष्ट असणे हे आजच्या काळात अत्यावश्यक झाले आहे.अशा वैचारिक प्रबोधनाबरोबर तात्कालिक घटनांमधील सत्यासत्यता पडताळून वास्तव परिस्थितीवर प्रकाश टाकणारे साहित्य संकीर्ण, शोधप्रबंध व लेखसंग्रह अशा तीन प्रकारांमध्ये प्रबोधिनीने प्रकाशित केले आहे.सामाजिक कार्यकर्त्यांना व समाज चिंतकांना दीर्घकाळ संदर्भासाठी उपयोगी होऊ शकेल अशा विषयांवरील लेखन प्रबोधिनीच्या प्रकाशन विभागातर्फे प्रकाशित केले आहे.